Wed 27 May, 2020

ME TIME : स्वतःशी निवांत संवाद साधण्यासाठी

'हे विश्वचि माझे घर' असे म्हणणाऱ्या आपल्या संस्कृतीमध्ये ‘ME TIME’ म्हणजेच माझा वैयक्तिक वेळ ही संज्ञा थोडी नवीन आहे. आपल्या संस्कृतीत मी, मला, माझं, माझ्यासाठी या गोष्टींना तसं लौकिकदृष्ट्या फार महत्व दिलं जात नाही. मात्र, हे 'मी पण' जपणंही तेवढंच गरजेचं आहे, असं मला वाटतं. 

हे 'मी'पण अहंकारातून आलेलं नाही, हे लक्षात घ्यायला हवं. याउलट माझं घर, माझी माणसं, माझी संस्कृती असं सगळं मनापासून जोपासत असताना हरवलेलं हे मी पण आहे. हा एक स्वतःचाच स्वतःशी असलेला निवांत संवाद आहे, ज्याची नाळ हळूहळू तुटत चालली आहे. 

सकाळी उठल्यापासून आपल्या डोक्यात वेळेचं आणि विचारांचं चक्र अव्याहत चालू असतं. यालाच आपण नित्यक्रम म्हणजेच आपल्या नेहमीच्या भाषेत 'रुटीन' म्हणतो. व्यक्तिपरत्वे या रुटीन बद्दल विचार करण्याची आणि ते अंमलात आणण्याची पद्धत वेगवेगळी असते. असं असलं तरीही, आता एखादी गोष्ट करुन झाली की त्यानंतर काय करायचं याचं चक्र सतत प्रत्येकाच्या डोक्यात चालू असतं. 

कळत्या वयात आल्यानंतर अनेक लहान-मोठ्या जबाबदाऱ्या आपण निभावत असतो. त्यानंतर कर्त्या वयात कौटुंबिक जबाबदारी साहजिकच अंगावर पडते. या सगळ्या जबादाऱ्यांमुळे आपला प्राधान्यक्रम बदलत जातो. 

आपण दैनंदिन जीवनात घरात, समाजात आणि नोकरीच्या ठिकाणी वेगवेगळी नाती निभावत असतो. आपला वेळ या सगळ्या गोष्टींत विभागला जातो. कळत नकळत आपण आपलेच राहत नाही. घर,नोकरी,समाज या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्याचा केवळ एक भाग आहेत. हे सगळं म्हणजे मी नाही, हे आपण विसरून जातो. 

आज ज्या मुलांसाठी आपण इतकी धावाधाव करतोय, ती मुलं एक ना एक दिवस आपलं हे घरटं सोडून जाणार आहेत; कदाचित कधीच परत न येण्यासाठी. ही वस्तूस्थिती आजकालच्या बहुतेक पालकांना माहित आहेच. मग या सगळ्यासाठी स्वतःची शारीरिक आणि मानसिक तयारी करण गरजेचं नाही का?

'Body is the only place, where we live' हे अंतिम सत्य आहे. दिवस येतात आणि जातात. पण आपल्या व्यापामध्ये स्वतःची आंतरिक प्रगती कधी थांबली, हे मात्र आपल्याला कळत नाही. म्हणूनच या शरीराची आणि त्यावर पगडा असणाऱ्या आपल्या मनाची तपासणी नको का करायला?

दिवसभरात फक्त १५ मिनिटांचा वेळ स्वतःसाठी काढा. घरातील तुमच्या आवडत्या खिडकीपाशी, बाल्कनीत बसा. आकाशाकडे पहात मन शांत करण्याचा प्रयत्न करा. हातात कॉफीचा किंवा वाफाळलेल्या चहाचा कप घ्या. त्याचा सुगंध तुमच्या रोमारोमात भिनू द्या. मानसिक शांतता अनुभवा. कारण,मला वाटतं खळखळणारं पाणी जेव्हा एका खोल डोहात स्थिरावतं तेव्हाच त्याचा तळ दिसतो. 

काही वेळासाठी स्वतःचेच मित्र व्हा. स्वतःलाच कुरवाळून पहा. स्वतःला विचारा, "अरे तुला आज कंटाळा आलाय का?" 

एखादा विनोदी किस्सा आठवून पहा. बघा चेहऱ्यावर हसू येतं की नाही. आवडतं गाणं गुणगुणा. वाऱ्याची झुळूकसुद्धा सुखावून जाते की नाही पहा. कोणालातरी निस्पृह भावनेने केलेली मदत आणि त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर आलेले भाव आठवून पहा. तुमच्या मध्येही चैतन्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. 

काही वेळासाठी स्वतःचेच मित्र व्हा. PC: ibudanmama.com

 कधीतरी स्वतःचाच आढावा घ्या. स्वतःला विचारा की, मला आयुष्यात नक्की हेच करायचं होतं का? जर याचं उत्तर नाही असं असेल तर, आत्ता मी त्यासाठी काय करू शकतो/शकते, याचा विचार करा. 

स्वतःचे छंद, खाण्यापिण्याच्या बदलत्या आवडीनिवडी याचा थोडा विचार करा. मला माझे छंद कसे जोपासता येतील, त्यासाठी माझा वेळ मी कशाप्रकारे कार्यक्षमतेने वापरू शकतो/शकते, याचं विश्लेषण करून पहा. 

आजकाल बऱ्याच वाद्यांचे, गायनाचे वर्ग ऑनलाईन उपलब्ध आहेत. जे छंद जोपासण्यासाठी कालपर्यंत घराबाहेर पडावं लागत होतं, ते छंद आज घरी बसून जोपासता येणं शक्य आहे.

ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांनी नवोदित लेखक नवनवीन कादंबऱ्या याबाबत माहिती मिळवा. बऱ्याच प्रख्यात पुस्तकांची ऑडिओ स्वरुपातील पुस्तके आज उपलब्ध आहेत. ती डाऊनलोड करुन ऐका. 

ज्यांना खेळाची आवड आहे, त्यांनी या क्षेत्रातील सध्याचे खेळाडू, आगामी स्पर्धा आणि खेळातील नवीन तंत्र या विषयांची माहिती मिळवावी.  तुम्हाला जमलं तर एक छोटी रोजनिशी करा. या रोजनिशीत यासंदर्भातील साऱ्या विचारांची नोंद करा. म्हणजे पुन्हा वाचताना आपल्यालाच आपल्या विचारांची सुसूत्रता तपासून पाहता येईल. 

स्वतःच्या लहान लहान शारीरिक तक्रारींविषयी विचारा स्वतःला. त्या दूर करण्यासाठी व्यायाम करा. इथे मला अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, तरुण पिढीतील बहुतांश लोकांमध्ये व्यायामाबाबत उदासीनता आहे, विशेषतः महिला वर्ग. 

आजच्या लहान मोठ्या तक्रारी उद्या आपल्याला मोठी शारीरिक व्याधी देऊ शकतात. याचा आपल्याला आणि आपल्या प्रियजनांना किती त्रास होईल, हा विचार करायला हवा आणि त्यादृष्टीनं पावलंही उचलली जायला हवीत. 

आता तुम्ही म्हणाल की, घरातली, बाहेरची इतकी सगळी कामं करून आम्ही दमून जातो. मग कसा मिळणार वेळ?

काही माणसं मी स्वतः पूर्ण कुटुंबाची घरातील, बाहेरील सगळी कामं करतो/करते, मला कोणाचीही मदत लागत नाही', हे सांगण्यात अतिशय धन्यता मानतात. पण जर तुम्हाला रोजच्या जीवनात स्वतःसाठी १५ मिनिटांचा वेळ काढणं जर अवघड जात असेल; तर आपल्याकडे असलेल्या कामांचे वितरण आपल्याच कुटुंबातील सदस्यांमध्ये करता येणं शक्य आहे का, याचा विचार नक्की व्हायला हवा. 

याचबरोबर काही कामं आपल्याला बाह्य स्त्रोतांच्या मदतीने करता येतील का, याचाही विचार केला जावा. कारण जोपर्यंत, आपली काही ऊर्जा आपण या नूतनीकरणासाठी वाचवणार नाही, तोपर्यंत आपल्याला हा वेळ सापडणार नाही.

बघा, जसं आरशावरचे डाग पुसले की चेहरा परत स्वच्छ दिसू लागतो, तसंच हा स्वतःसाठी काढलेला वेळ तुम्हाला तुमची नव्याने ओळख करून द्यायला मदत करेल. आयुष्यात आपण सगळ्यांना समाधानी ठेवू शकत नाही. पण कमीत कमी स्वतःचं समाधान कशामध्ये आहे, हे शोधण्याचं आणि त्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं समाधान हा स्वतःचा वैयक्तिक वेळ तुम्हाला नक्की देऊ शकेल. 

आयुष्याची संध्याकाळ येईपर्यंत कोणते रंग मावळतील आणि कोणते उगवतील, हे कोणालाच सांगता येणार नाही. पण 'रंग माझा वेगळा' कोणता हे शोधता आला तर याची तृप्तता तुम्हाला नक्की जाणवेल. 

वेदिका पत्की

वेदिका पत्की ह्या सेल्फ-हेल्प आणि सामाजिक विषयांवर लेखन करतात. त्यांचे अनेक ब्लॉग प्रसिद्ध आहेत.

लेखामध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत हे लेखकाचे वैयक्तिक असून ते The Tilak Chronicle आणि TTC Media Pvt. Ltd. च्या अधिकृत धोरण किंवा मतांपेक्षा भिन्न असू शकतात.