Wed 27 May, 2020

कोरोना: जीवनपद्धती सुधारण्याची संधी

अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या प्राथमिक गरजा होत. या गरजांची सहज पुर्तता होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असली म्हणजे माणूस समाधानी असतो. पूर्वी आपल्या भारत वर्षात लोकांच्या गरजा कमी होत्या. 

शेती हाच प्रामुख्याने व्यवसाय होता. उपभोग्य वस्तू या शेतीशी आणि निर्धोक जगण्याशी निगडीत होत्या. उदा., बैलगाडी, नांगर, मोट, विळा, खुरपे, कुदळ, फावडे ही शेतीची अवजारे, पायातील वहाण, सुती वस्त्रे, देवपूजेची आणि स्त्री शृंगाराची साधने इत्यादी. 

माणूस सुखी आणि समाधानी होता. ‘सर्वे भवन्तु सुखिनः’, ‘अतिथि देवो भवः’ ही आपली संस्कृती होती. त्याकाळी स्वत:च्या गरजा पूर्ण झाल्या की, माणूस त्याच्याकडे उपलब्ध असलेली अतिरिक्त साधनं ज्यांना त्याची कमतरता आहे त्यांना देई. 

लोक गुण्यागोविंदाने रहात होते. एकमेकांना मदत करीत होते. निसर्गाची जपणूक हीच त्या काळची जीवनपद्धती होती. पूर्वजांनी त्या करिता अनेक परंपरा, सण आणि उत्सव निर्माण केले होते. उदाहरणार्थ, वटपौर्णिमा, गुढीपाडवा, नवरात्र, बैलपोळा आदी.  

अन्न वाया घालवणं, पाणी खराब करणं, नको असताना जंगल तोडणं हे पाप समजलं जात असे. उगाचच प्राण्यांची हत्या केली जात नव्हती. देवासमोर बळी दिलं जाणारं कोंबडं आणि बकरं, तसंच केवळ शौक म्हणून शिकार करणारे राजे रजवाडे यांचाच काय तो अपवाद असे.  

लोकसंख्या वाढीचं नियंत्रण नैसर्गिकरित्या होई. महापूर, भूकंप, साथीचे रोग तसेच लढायांमध्ये लक्षावधी लोक नष्ट होत. पण त्यानं समाजात फार मोठी अस्वस्थता निर्माण होत नसे. 

हे निसर्गाचे चक्र आहे, असं मानून समाज पुढे जात असे. एकूणच,सारं समाजजीवन हे एखाद्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे शांत, संथ आणि निसर्गाच्या लयीत चाले.

मात्र युरोपातील औद्योगिक क्रांतीनंतर जगभर चंगळवादी संस्कृती निर्माण झाली. भारतात याचे दृश्य परिणाम दिसायला आणि जाणवायला एकविसावं शतक उजाडलं. अमर्याद गरजा, काहीही करून त्या पूर्ण करण्याची अभिलाषा; यासाठी नैसर्गिक साधनांचा अतिरेकी वापरही या संस्कृतीची वैशिष्ट्ये सांगता येतील.

प्राथमिक गरजांची पूर्तता झाल्यावर एकूणच जीवनातल्या संघर्षाची धार कमी होते. माणसाला एक प्रकारचा निवांतपणा अनुभवाला येतो. अशावेळी व्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिकता, राजकारण, सत्तेची लालसा, सामाजिक प्रतिष्ठा, यासारखे माणसाचा अहंकार सुखावणारे विषय मनात घर करू लागतात. 

युरोपातील औद्योगिक क्रांतीनंतर जगभर चंगळवादी संस्कृती निर्माण झाली. PC: My Foresight

‘बळी तो कान पिळी’ या न्यायानं जगाला वाकवण्याची ताकद फक्त सत्ताधारी व्यक्तीकडे असते. ज्याच्याकडे जादा संपत्ती, मालमत्ता असते त्यालाच लोक सलाम करतात. त्यालाच सत्ता मिळते. 

म्हणून सत्ता हेच ध्येय ठेवून जास्तीत जास्त संपत्ती, मालमत्ता मिळवण्यासाठी स्पर्धा सुरु होते. त्यातूनच चंगळवाद उदयाला येतो. बाजारातल्या उत्पादकतेची त्याला साथ मिळाल्यानं, चंगळवाद दिवसें-दिवस फोफावत जातो.

उपलब्ध नैसर्गिक साधनांचा पुरेपूर वापर करायचा, हे चंगळवादी संस्कृतीचं मूळ तत्व असतं. मग माणसं बेसुमार जंगलतोड करतात. अधिकाधिक खनिज संपत्ती खोदून काढतात. 

जमिनीतलं पाणी उपसतात. डोंगर उध्वस्त करून घरं बांधतात, नद्या अडवून त्यांना बंधारे घालतात. तऱ्हेतऱ्हेच्या उपभोग्य वस्तू निर्माण करतात. रोज नवे शोध आणि रोज नव्या कल्पना यांच्या आधारे, विविध प्रकारची अनेक यंत्रे तयार करतात. माणसाला त्या यंत्राचे गुलाम बनवलं जातं. 

आपलं उत्पादन कसं श्रेष्ठ आहे, हे लोकांना पटवून देण्यासाठी उद्योगांकडून त्यांच्यावर जाहीरातींचा मारा केला जातो. त्या जाहिरातींना बळी पडून माणूस भारंभार अनावश्यक वस्तू खरेदी करतो. 

आज आपल्याजवळ जे आहे त्यापेक्षा अधिक हवं, अशी माणसाची मनोवृत्ती तयार होते. मग तो कायम असमाधानी रहातो. मनाचं स्वास्थ्य हरवून बसतो. त्याचा परिणाम त्याच्या आणि पर्यायानं समाजाच्या आरोग्यावर होतो.

स्पर्धेची भावना एकदा माणसाच्या मनावर स्वार झाली, की माणसाकडे संयम रहात नाही. अशा माणसांनी बनलेला समाज अशांत बनतो. एवढ्या तेवढ्या कारणानं क्षणात बिथरतो. 

मारामा-या, खून, हत्या करायला प्रवृत्त होतो. प्रत्येकजण दुस-याकडे संशयानं बघतो. सामाजिक सलोखा नाहीसा होतो. स्वार्थ, गुंडगिरी, संपत्ती व सत्ता यालाच प्रतिष्ठा मिळते. 

त्यामुळं भ्रष्टाचार, फसवणूक, खोटेपणा यांचं फावतं. चारित्र्य, प्रामाणिकपणा, कामसू वृत्ती, परोपकार याला किंमत रहात नाही. माणूस मुखवटे घेऊन वावरतो. हरतऱ्हेचे कपडे, गाडया, दागदागिने, फ्रीज, टीव्ही, मोठमोठी घरे, त्याच्या मालकीची असतात, खाण्यापिण्याच्या पदार्थांची रेलचेल असते. पण मन:स्वास्थ्याच्या अभावी तो सुखी, समाधानी राहू शकत नाही.

चंगळवादाला बऱ्याचदा विकास हे गोंडस नाव देऊन त्याची भलावण केली जाते. माणसाला मोठमोठी भौतिक स्वप्नं दाखवली जातात. त्यांची पुर्तता करण्यासाठी वेगवेगळे मार्ग सुचवले जातात. त्यामुळे जीवनात सुखी होण्यासाठी अधिकाधिक भौतिक साधनं जवळ असली पाहिजेत, ही त्याच्या विचाराची पक्की धारणा बनते. 

ती मिळवण्याचा प्रयत्न करणं हे त्याच्या जीवनाचं एकमेव ध्येय बनतं. मुलांना सुद्धा लहानपणीच अशी स्वप्नं दाखवून धडपड करायचं बाळकडू दिलं जातं. ती लहान वयात स्पर्धेसाठी पळायला लागतात. अशाच प्रकारचं ध्येय बाळगून त्याच्या सिद्धीसाठी धडपडतात. 

पण सा-या अपेक्षा आणि इच्छा यांची पूर्तता होऊ शकत नाही. झाली तरी त्यातून अपेक्षित समाधान मिळत नाही. मग माणसं आपलं समाधान हरवून बसतात. त्यातून आत्महत्या, नैराश्य, सामाजिक ताणतणाव यासारखे प्रश्न निर्माण होतात.

खरंतर, माणूस निसर्गाच्या जीवन-साखळीच्या चक्राचा एक भाग आहे. उत्पत्ती, वाढ आणि विनाश हे मानव, प्राणी व वनस्पती यांचं जीवनचक्र. पर्जन्यचक्र, समुद्राची भरती-ओहोटी, आकाशात उगवणारे सूर्य-चंद्र, हवामानात होणारे बदल, त्यानुसार होणारी वादळं, नद्यांना येणारे महापूर, ही सारी निसर्गाची सुनियोजित व्यवस्था आहे. 

या व्यवस्थेचा यथायोग्य सन्मान करून, माणूस, प्राणी आणि वनस्पती सुखनैव जीवन जगू शकतात. निसर्गत: हे तीनही घटक परस्परांवर अवलंबून आहेत. पण मानव आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ही नैसर्गिक व्यवस्था उलथवून टाकतो. अतिहव्यासापोटी हवा, पाणी प्रदूषित करतो. 

फटाके, मोठमोठे ध्वनिक्षेपक यांच्याद्वारे ध्वनी प्रदूषित करतो. प्राणीजीवन त्रासून जाते. वनस्पती आणि प्राणी यांचं आस्तित्व धोक्यात येतं. माणूस स्वत:देखील नकळत त्याचा बळी ठरतो.

आज इतक्या वर्षानंतर का होईना पण चंगळवादी वृत्तीमुळे होणा-या या दुष्परिणामांची जाणीव सबंध जगाला झालेली आहे. यातून बाहेर पडायला हवं, अशी समाजमनाची भूमिकादेखील तयार झाली आहे. म्हणूनच, या वृत्तीचा, जीवनशैलीचा, आणि विचारसरणीचा पुनर्विचार करणं आवश्यक आहे. 

मर्यादित गरजा, मनावर ताबा, नैसर्गिक व्यवस्थेविषयी जागरूकता आणि निसर्गाची जपणूकया चतु:सूत्रीचा वापर करून आपल्याला तो जुना काळ पुन: आणता येईल. फक्त याची जाणीव प्रत्येक माणसाच्या मनात निर्माण होणं आवश्यक आहे. 

हे साधण्यासाठी सर्व जगाला अथक प्रयत्न करावे लागतील. तरच भविष्यातला मानव सुखी आणि समृद्ध आयुष्य जगू शकेल. हे सारे आज मनात यायचं कारण म्हणजे, यावर विचार करायची संधी कोरोना नावाच्या महाभयंकर आणि जगभर पसरलेल्या रोगाने आपल्याला दिली आहे. 

आज सगळीकडे भयाण शांतता आहे. माणूस गोंधळून गेला आहे. जनजीवन स्तब्ध झाले आहे. जंगल शांत आहे. नद्या स्वच्छ झाल्या आहेत. निसर्ग सुखावला आहे. माणसं घरात अडकून बसल्यामुळे त्यांना या विषयावर मूलभूत विचार करायला पुरेसा वेळ आहे. 

आपला आजवरचा जीवनप्रवास कसा घडला? आपण कुठे येऊन पोहोचलो? आपली आजची जीवनपद्धती यापुढे राहील का नष्ट होईल? माणूस, प्राणी आणि वनस्पती ही जीवनसाखळी कशी टिकवायची? या प्रश्नांकडे तो नव्याने पाहू शकेल. सुधारणा करू शकेल. नवा समाज घडवू शकेल. या सुसंधीचा त्याने जरूर उपयोग करायला हवा.

सुहास परळे

सुहास परळे हे केंद्र शासनात ऑडिट ऑफिसर म्हणून २०१४ पर्यंत कार्यरत होते. ते सध्या विविध मासिकांमधे कविता, गोष्टी आणि लेख लिहितात.

लेखामध्ये व्यक्त केलेले विचार आणि मत हे लेखकाचे वैयक्तिक असून ते The Tilak Chronicle आणि TTC Media Pvt. Ltd. च्या अधिकृत धोरण किंवा मतांपेक्षा भिन्न असू शकतात.